वेदना मर्त्य असते का?..कि,चिरंतन असते? मला दोन्हीही पोकळ वाटते.वेदना फक्त असते.तीच असणच तिला अस्तित्व प्राप्त करून देत.तिला बोलकी करत.वेदनेच वाहण मला जिवंतपणाच लक्षण वाटत.जसजशी ती शरीरातून झिरपत जाते तसतसा माणसाला आकार येतो आणि त्यातूनच त्याचा प्रवास निराकाराकडे सुरु होतो.
मी नैराश्याने ठार वेडा झालो आणि मला वेदना आवडू लागली.ठसठसणारी प्रत्येक जखम मला पुनर्जन्म देऊ लागली.काळीज चिरणारी प्रत्येक गोष्ट मला हवीहवीशी वाटू लागली.मला दान हव होत स्वत:ला जीर्ण करण्याच.स्वत:ला मुळापासून उपसण्याच...इंद्रायणी सोडून गेली आणि मी पहिल्यांदा जखमी झालो.भर पावसात ती गेली.मागे पडलेला अथांग असा वैराण प्रदेश ती सोडून चालली होती.ना तिला कसली भ्रांत होती नाही शोकांत.मात्र मी धारोष्ण रक्तात पडलेल्या कलेवरासारखा झालो.कोसळत्या पावसाकडे बघण्याशिवाय काहीच करू शकत नव्हतो.ती निघून जाणार असती तर मी प्रतिकार केला असता.पण ती सोडून जात होती.निघून जाणाऱ्या प्रवाशाला रस्ता माहित नसतो.मात्र सोडून जाणारा प्रवासी आधीच रस्ता आखून जातो.
मी दुसऱ्यांदा जखमी झालो.मात्र हि जखम पूर्ण देहाला नासवून गेली.अश्याच एका अशांत संध्याकाळी मी लिहायला बसलो.माझ्या एका हाथात लेखणी आणि दुसऱ्या हाथात सिगारेट व टेबलावर दारूची बॉटल..आणि समोर होता,घनदाट पसरलेला अमित काळोख.मी लेखणी हाथात घेतली आणि लिहू लागलो.एक शब्द,दोन शब्द...तीन...चार...पाच...सहा....सात..आणि लेखणी थांबली..बोट जणू लुळे पडले होते.एकही शब्द लिहीन जमेना.मी नुसत्या रेघोट्या मारत होतो.चित्र विचित्र रेखाटन काढू लागलो.काहीच सुचत नव्हत.मी गच्च डोक दाबल.आणि त्या भयाण काळोखाकडे पाहिलं.विराट काळोख..काळाकभिन्न.हाच काळोख माझ्या डोळ्यात साचला.कागदाचा पांढरा रंग आणि रात्रीचा काळा रंग डोळ्यात उतरला.आणि मेंदूत तुफान उसळल.विचारांचे जथेच्या जथे मेंदूला धडका देऊ लागले.कृष्णविवराच्या अवकाशात पसरलेली माणवाच्या चिरंतन दुखा:ला आश्वस्त करणारी अस्वस्थता.कुरुक्षेत्रात मरून पडलेल्या असंख्य देहाला अमर करणारी जाज्वल्य ज्योत.लसलसस्त्या दैन्यातून मुक्त करणारी भडाग्नी.पार्थिव आणि अपार्थिव सीमारेषेवरून हळूहळू सरकणाऱ्या कित्येक जीवघेण्या उल्का माझ्या शरीरात प्रवेश करू लागल्या.माझ्या शरीरात एक अनामिक चैतन्य दाटल.हा हा म्हणता म्हणता मला असंख्य भास पडू लागले.चित्रविचित्र स्वप्नाने माझे डोळे लाल झाले.नसा तटतटू लागल्या.साऱ्या शरीराला वणवा लागल आणि त्याच क्षणी मी वेडा झालो.ठार वेडा.
आयुष्यभर लिहिलेलं लिखाण मी जाळून टाकल.घरालासुद्धा आग लावली आणि पळत सुटलो.खूप जोराने.धावणारे पाय आणि उसळणारा श्वास ह्याखेरीज काहीच जाणवत नव्हत.
- पी.निरंजन
