गंधार
गंधार संध्याकाळी मेला. सायंकाळचा संधीप्रकाश त्याच्या चेहऱ्यावरून सरकत संपूर्ण शरीरभर वाहू लागला.मध्यरात्री अबोल असलेल्या समुद्र सारखा तो निश्चल पडून होता.झोपेतच मेल्याने अजूनही जिवंत वाटत होता.स्वतःला वाचविण्याचा कसलाच आटापिटा त्याने केला नव्हता.त्याची खोलीसुद्धा समाधीत मग्न असलेल्या तपसव्या सारखी भासत होती.विलक्षण शांत.तरीपण एक भेसूर ताण वातावरणात जाणवत होता...
आम्ही त्याला बेडवरून कपड्यानिशी उचललं.कपड्याला दारूचा वास येत होता.आम्ही चटईवर त्याचा देह ठेवला.आता ह्या देहाला नाव नव्हतं.फक्त तो रक्तामांसाचा गोळा होता.मी बराच वेळ खोलीत सैरभर पाहत होतो.तोपर्यंत त्याचे पाहुणे आले.मोजकेच.त्यांचा आकांताचा विधी सुरू झाला.मी चहा प्यायला गेलो.माणूस मेल्यानंतर घरात लावणार संगीत मला खूप डसंत.ते आतड पिळवटणार संगीत एकल तर खरच जीव द्यावासा वाटतो.माणसाचा मृत्यू हा एक सोहळाच पण हया सोहळ्यात असल भयाण संगीत नको. चहा संपला.मी गंधार सोबत घालविलेलं दिवस आठवायचा प्रयत्न करू लागलो पण ते आठवतच नव्हते.अखेरीस घराकडे वळलो.
त्याचे एक दोन नातेवाईक प्रेत पायऱ्यांवरून खाली उतरवीत होते.मी पुढे झालो,सावकाशपणे त्याच प्रेत गाडीत ठेवलं आणि आत बसलो. प्रेताभोवती पांढरा कापड गुंडाळला होता.आज पहिल्यांदा त्याच्या अंगावर कपडे खुलुन दिसत होते.तशी त्याला कपडे लागले नाहीत.म्यानातून काढलेल्या नंग्या तलवारीप्रमाणे तो जगला.पांढरा रंग शांतीच प्रतीक समजल्या जाते. किती भयंकर आहे ना माणूस मेल्यावर त्याला शांत झालेलं समजणं.
स्मशान आलं .सरण आधीच रचलं होतं.सरणाच्या बाजूला दुसरं एक प्रेत जळत होत,ते एका लहान मुलांच प्रेत होत त्याच्या बाजूलाच एक बाई होती,ती त्या मुलाची आई असावी. छाती पिळवटून रडत होती.अतिशय आकांडतांडव.पण ती कुणासाठी रडत असावी?..सगळीकडे तर प्रेतेच जळत होती.थोड्या वेळानंतर गंधारचा देह सरणावर ठेवण्यात आला .रॉकेलचे शिंतोडे उडविण्यात आले आणि आगीने पेटलेली कडी सरणाला लावली.जंगलाला लावलेल्या वणव्यासारख सरण जळू लागल.लालभडक आगीच्या लोळाने गंधारला गिळल.खूप वेळेपर्यंत सरण जळत होत.हळूहळू लोकसुद्धा निघू लागली .एवढ्यात एकजण माझ्यापाशी आला.आणि म्हणाला कवटी फुटली तुम्हीसुद्धा निघा.मला आश्चर्य वाटलं मला कसलाच आवाज आला नाही.अशावेळी काहीतरी फुटू शकते हे मला कस जाणवलं नाही. तसही आता थांबण्यात काही बाकी नव्हतं.
राख उरेल पण कुणाचीही राख झालेली मला बघवल्या गेलं नसत.मी स्मशानातून बाहेर आलो.संध्याकाळच रात्रीत रूपांतर झाल होतं आणि रात्र अतिशय फुलून आली होती.बाळंत झालेल्या एका नववधू सारखी.

Very nice!
ReplyDeletethanks bhai
ReplyDelete