Monday, June 28, 2021

एक अनाहूत पत्र

                       



डीअर मारिया,

          

              तु खूप आठवतेस.असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी तुझ्या आठवणीच युद्ध उसळल नसेल.तुला जेवढ आठवावं तेवढी तु ताजी होतेस.मात्र हे ताजेपण मला उध्वस्थ करत.भग्न करत.आठवणीच्या श्रापातून मुक्त होण्याचा मूलमंत्र सापडेपर्यंत हि मालिका अशीच सुरु राहील.

            आता तर रात्रसुद्धा जखमी नागिनीप्रमाणे डसते.काल रात्रीची गोष्ट.मी झोपण्यासाठी डोळे मिटले आणि नेहमीप्रमाणे डोक्यात विचारच वावटळ उठल.एक विचार आकाशात सोडलेल्या रॉकेटप्रमाणे मेंदूत घुसला कि आज मला झोपच येणार नाही.काय फालतू विचार होता .पण खरं सांगतो.रात्रभर वेड लागलेल्या रुग्णासारखा छताकडे पाहत राहिलो.सतरा वेळ खोलीमधून चकरा मारू लागलो.पळून जावस वाटत होत,लगेच कुठेही आणि अतिशय वेगाने कुणाचा तरी खून करावासा वाटत होता.पॉल गोगीणला मारायला हाथात सुरा घेऊन धावणाऱ्या व्हान गोघसारख.माणसाला थंड करणारी हिंसा असेल तर ती मी नक्की करेल.बाहेर अंधारच स्मशान झाल होत आणि माझ्या डोळ्यात रणांगणात सांडलेल्या रक्ताची विराट शांतता.डोक्यात उठलेल्या विचाराच्या जथ्याला मरण नाही,हे कळल.दुसऱ्या दिवशी मनोवैज्ञानिकाकडे गेलो.ठणठणीत बरा असल्याच प्रमाणपत्र दिल.शुद्ध फसवेगिरी होती.जगण्याच्या अपार्थिव हेतूला वणवा लावण्याचा प्रयत्न होता.पण मी स्वत:शी प्रामाणिक राहण्याचं ठरवील.

           तुटलेल्या पैंजणातून निघणाऱ्या हुंद्क्याप्रमाणे माझ्यातील वेदना वाहू लागली.माणसातून उठण्याची प्रत्येक विधी मी पार पडली होती.आता वाट पाहण असह्य होत.हाका कानावर येण्याच्या आधी मी पळत सुटलो.कुठे कधीपर्यंत,कितीवेळ अश्या मर्यादेच वर्तुळ नव्हत.फक्त अपरिमित पसरलेल्या बेटावरच शेवाळ तेवढ बाकी होत.फक्त शेवाळ.मी हाथाने बाजूला ढकलीत त्या उमलत्या गर्भातून चालू लागलो.मारिया हे....अस चालण मला खूप आवडत.फक्त चालण.रस्तासुद्धा नको वाटत.तो जरी कुठे संपत नसला तरी त्याची सुरुवात कुठून तरी झालेलीच असते.

           तुला माहित असेलच,पॅरिसच्या एका नाईटक्लबमध्ये पहिल्यांदा तू मला दिसलीस आणि मला निखाऱ्यावरून चालण पसंत पडल.तुझ्या हाथातील व्हिस्कीचा ग्लास मला मरणघरातून आणलेला लामणदिवा वाटतो.ज्याची एक ज्योत माझ्या पाठीच्या मणक्यात बांधलेली आहे आणि दुसरी ज्योत तुझ्या.तिकडे तू,तो ओठाला लावावा आणि इकडे मला मृत्यूने रसरसलेल चुंबन मिळावं..

          

          “ कौनसी जंजीर थी

             इन आंखो मे 

             शायद एक नशा था 

             जानलेवा...”

     

       मारिया,खरच संपल्यानंतर येणारा मुक्तपणा कुठल्या स्वातंत्र्याचा समानार्थी शब्द असेल,मला वाटत नसेलच बहुतेक.


                                                     तुझाच,

                                                 ..पुरुषोत्तम 


                                                         -पी. निरंजन

                           

No comments:

Post a Comment

प्रश्न

       दिवसागणीक सरणारी रात्र आता मला छळते आहे. इतका मनस्ताप  कधीच मला झाला नव्हता. संध्याकाळ झाली की मी लिहायला बसायचो आणि सोबत प्यायलासुध्...