Tuesday, March 30, 2021

दुःखाची संगती

 



             काही दिवसापूर्वीची गोष्ट, मी बी ए. तृतीय वर्षाच्या मुलांना मराठी शिकवीत होतो.विद्याधर पुंडलिकांची 'चक्र' नावाची एकांकिका अभ्यासक्रमात होती.'चक्र' ही महाभारतातील विविध व्यक्तिरेखेवर आधारलेली एकांकिका आहे.त्यातील द्रौपदीची व्यक्तिरेखा माझ्या मनाला भयंकर चटका लावून गेली.द्रौपदीने म्हटलेली दोन वाक्य आजतागायत माझ्या काळजाला पोखरत आहेत.एके ठिकाणी द्रौपदी भीमाला म्हणते,"मला माझ्या दुःखाची संगती कळली पाहिजे".दुसर वाक्य,"शेवटी धर्म आणि अधर्मापेक्षा, कर्म आणि अकर्मापेक्षा दुःखच खर आहे".

        ह्या दोन्ही वाक्यातून दुःख या आदिम व सनातन मानवी भावनेच अचूक विश्लेषण करण्यात आलेल आहे.पहिल्या वाक्यात  द्रौपदी म्हणते,दुःखाची संगती.मला स्वतःला संगती हा शब्द फार म्हणजे फार आवडला.दुःखाच्या अर्थप्रकटीकरणासाठी संगती शिवाय अन्य कुठलाही शब्द तेवढा सखोल व परिपुर्ण वाटला नसता.ह्या एकाच शब्दाने मला पुंडलिकाप्रति आसक्ती निर्माण झाली.महाभारतात दोन अश्या व्यक्तिरेखा आहेत ज्या दुःख,वेदनेने सर्वाधिक होरपळुन निघाल्या आहेत.एक म्हणजे द्रौपदी,दुसरा म्हणजे अश्वथामा.महाभारतातील नृशंस युद्धाची निर्मिती सूडभावनेतून झाली.प्रत्येकाच्या मनात ह्या सुडाने हैदोस माजविला होता. द्रौपदीच्या मनातही हा सूड हळूहळू हाथपाय पसरत होता.मात्र ह्यामागे तिच्या काळजाला ज्याअसंख्य जखमा झाल्यात त्या कारणीभूत आहेत.भरसभेत द्रौपदीची झालेली विटंबना आणि युद्धाच्या अखेरीस क्रूरपणे अश्वत्थाम्याने द्रौपदीची मारलेली पाचही मुलं. ह्या सर्व घटनेमुळे द्रौपदीच्या वाट्याला आलेलं दुख हे अतिशय संहारक आणि भेदक होत.तिच्यातल्या स्त्रीत्वाचा आणि मातृत्वाचा निर्घृण खून करण्यात आला.त्यामूळेच द्रौपदी पिसाळली, दुःखाने अंध झाली.शेवटी तिने ह्यावर उतारा म्हणून भिमाकडे अश्वत्थाम्याचा सूड मागितला.आणि ह्यातूनच अश्वत्थाम्याला कधीही भरून न निघणारी लसलसती झखम झाली.हा सर्व विनाश झाल्यावर बराच अवकाश निघून गेला,काळ निघून गेला.आता द्रौपदीला नव्याने काही प्रश्न पडत अहेत.ती म्हणते,"मला खरंच माझ्या दुःखाची संगती कळली का?",मला जे मिळालं ते समाधानकारक आहे का? माझ्या दुःखाच खरोखर निवारण झालं का? आणि ह्या तडफडण्याला एकच उत्तर मिळाल..'नाही'.

       आता मला प्रश्न पडतो,खरंच काय असेल दुःखाची संगती? कोणता चेहरा आहे दुःखाचा?...आणि असंख्य विचाराच्या मंथन केल्यावर  काही धागेदोरे हाथी लागतात.जे उत्तराच्या जवळ पोहचवितात.दुःखाच्या उत्पत्तीनंतर माणूस ते निवारणाच्या मागे लागतो. त्यावर उपाय शोधतो. मात्र ह्या भानगडीत तो दुःखाला पुरेपूर समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. ह्यामुळेच दुःख नेहमीकरता दूर होत नाही,तर ते रूपांतरित होत.पाण्यासारख.अवस्था बदलतात तीव्रता तेवढीच राहते.म्हणूनच जस एखाद्या आजारा मागील कारणे शोधल्यास त्या आजाराचं योग्य निदान करता येत.तसच दुःखाची नेमकी कारणे आणि त्याच स्वरूप कळलं तरच त्याचा नेमका अर्थ कळतो.इथं द्रौपदीला तिच्या दुःखावर उपाय नको होता.तिला फक्त तीच दुःख व त्याचा अर्थ कळायला हवा. त्यासाठीच ती जीवाचा आकांत करत होती. प्रत्येक दुःखाला, वेदनेला विशिष्ट खोली,मर्यादा व वेग असतो.त्या दुःखाची तीव्रता आणि सीमा माणसाला दुःखाच्या अधिक जवळ नेते.प्रेमात येणारा विरह,प्रियजनाचा मृत्यू,शारीरिक जखमा,अपयश ह्या सर्वतून उद्भवणाऱ्या प्रत्येक दुःखाला विशिष्ट असा आकार व खोली आहे. प्रेमातून निर्माण झालेल विरहाच दुःख दोघांसाठी सारखं आणि समप्रमाणात असत.मात्र एकतर्फी प्रेमातून आलेलं दुःख एकापूरत मर्यादित असत.तसच मृत्यूतून निर्माण होणार दुःख,त्याला ना मर्यादा आहे नाही ते चिरंतन आहे, ते फक्त अटळ आणि शाश्वत आहे.अश्या प्रत्येक दुःखाच्या विविध पातळ्याच्या रुपरेषेवरून दुःखाच एक प्रतिबिंब तयार होत.आणि मग आपण ठामपणे सांगू शकतो की हाच आहे दुखाचा मूळ अर्थ आहे.

          ह्या सर्व भौतिक पाठपुराव्याचा कसून विचार केला त्यावर सखोल चिंतन मंथन केल्यानंतर,आता ह्यापुढचा प्रश्न उपस्थित होतो,मग दुःख निवारण्याचा उपाय कोणता? परत एकदा विचारांचे घोडे धावायला लागतात.आणि बऱ्याच वैचारिक घुसळणीतून काही सूत्र माझ्या हाथी लागले.आणि मला दुःखाच एक नवीन रूप समोर दिसायला लागल.वेगाने एक विचार डोक्यात उसळला दुःखाच्या अटळ,अनाकलनीय,व अविनाशी ह्या गुणधर्मातच त्याच्या मुक्तीचा मूलमंत्र दडलेला नसेल का?.आणि मग मला द्रौपदीच दुसरं वाक्य आठवलं," धर्म आणि अधर्मापेक्षा व कर्म आणि अकर्मापेक्षा दुःखच खर आहे".इथं मला तीव्रतेने बुद्ध आठवला.आणि शतकानुशतके चालत आलेल्या ह्या मानवी वेदनेचा संग्राम निश्चितपणे थांबवता येईल असं वाटलं.

            महाभारतातील युद्धात प्रत्येकजण अधर्माने वागला .सर्वांनी वाईट व अनैतिक मार्गाचा अवलंब केला. पण एवढं सगळं होऊनसुद्धा कुणालाच आत्मिक समाधान लाभलं नाही.वाट्याला आलं ते रक्ताने माखलेल भळभळत दुःख.ह्यातूनच द्रौपदीला शाश्वत सत्याचा साक्षात्कार झाला.आणि त्याच्याच प्रत्यय म्हणजे तीन उद्गारलेलं दुसरं वाक्य.दुःखाच एकमेव,अंतिम,चिरंतन व अटळ असणं हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.बुद्धाने आपल्या जगण्यातून, भोगातून हेच सांगितलं. तेच सत्य व्यासाने अधोरेखित केल आहे.आता मला प्रश्न पडतो जर दुःख अंतिम, अटळ व चिरंतन असेल तर त्यावर चिरकाल टिकणारा उपाय, इलाज असेल का? असू शकतो का? आणि त्याच प्रामाणिक उत्तर आहे,"नाही".दुःखाच अंतिम,अटळ व चिरंतन असणंच त्याच्या अस्तित्वाची सीमारेषा निश्चित करत.आणि एक ज्वलंत व कठोर सत्य हाथात येत,ते म्हणजे दुःखावर अंतिम उपाय नाही. तो असूच शकत नाही,दुःख हे रूपांतरित होत ते नष्ट होत नाही. जसा अश्वत्थाम्याला अमरत्वाचा वरदान असतो तसाच दुःखालाही अमरत्वाचा वरदान लाभलेला आहे.त्यामुळे दुःख हे दूर करण्यासाठी नसून ते मनसोक्त भोगण्यासाठी,जगण्यासाठी आहे.जस सुखाशी आपण आत्म्याच्या देठापासून समरस होतो तसच  दुःखाशी समरस व्हायला हवं.तेव्हा कुठं हा जीवन नावाचा जुगार आनंदाने खेळता येतो. खुप दीवसाआधी लिहिलेलं माझंच एक वाक्य मला आठवत ,'प्रवासाचा शेवट न होणं हेच अंतिम सत्य आहे'.ह्याप्रमाणेच दुःखाच्या अपूर्णत्वा मध्येच त्याच्या पूर्णत्वाची संजीवनी दडलेली आहे..आणि हीच दुःखाची एकमेव व शाश्वत संगती आहे..


                                                            - पी.निरंजन


3 comments:

प्रश्न

       दिवसागणीक सरणारी रात्र आता मला छळते आहे. इतका मनस्ताप  कधीच मला झाला नव्हता. संध्याकाळ झाली की मी लिहायला बसायचो आणि सोबत प्यायलासुध्...