Sunday, August 15, 2021

दाह

 


          माझ्या प्रतिमेचा एक आरसा तुझ्या घरी असु दे.मी नसेल ह्या जगात तेव्हा तू मनसोक्त आरशात बघ. आणि मला अंतर्बाह्य जाणून घे.मी.पुरुषोत्तम..निसटत्या क्षणाचा साक्षीदार. कुठल्याच कळपात न बसणारा.अंगावरचे सर्व वस्त्र काढून भणंगपणे हिंडणारा गोसावी.ज्याला कुठल्याच पानगळीचा त्रास होत नाही,असा एकलशुन्य स्वामी.पण मी तेव्हाही  घनव्याकुळ होतो आणि आताही.बालपणी पावसाळ्याच्या दिवसात वीज गेली की आई मला पोटाशी घेऊन घट्टपणे बिलगे.त्यावेळी ती गर्भगळीत करणारी जीवघेणी भीती मला आजही पोळून काढते.मन अशाच अनामिक भीतीने गारठून गेलं आहे.एकाएकी आकाशात ढग जमावे आणि मरणाचा पाऊस पडावा तशी स्थिती झाली आहे.

            तू सोडून गेल्यावर कितीतरी वेळ ह्या पावसात मी भीजत होतो.पावसाच्या पाण्यासोबत निथळत होतो.पण पाणी अंगावरून गेलं म्हणजे जखमेची दाहकता कमी होत नाही.उलट काळानुसार ही दाहकता वाढते आणि  त्याचा ज्वालामुखी होतो.ग्रेसची कविता वाचताना हीच दाहकता अनुभवतो आणि परत स्वतःला जाळतो. जळण्या आणि जाळण्याच्या खेळात खरे मारेकरी कोण हेच मला आठवत नाही.वाळून गेलेल्या व्रणावरून काय अंदाज बांधता येईल म्हणा. परवा बाल्कनीत उभा असता  मला माझ्याच मृत्यूचा विचार आला.कसा असेल माझ्या मृत्यू ? मनासारखं होणार का?..आणि काही रम्य कल्पना डोक्यात रेंगाळू लागल्या.

               अशीच एक मद्यधुंद रात्र..मी टेबलावर..शेवटची कादंबरी लिहीत..माझ्या एका हाथात दारूचा ग्लास व दुसऱ्या हाथात सिगारेट...आणि  रेडीओवरती..आबिदा परविनाचा दैवी सूर लागलेला..

    " मेरा मुझमे कूछ नहीं

      जो कुछ है सो तेरा

      तेरा तुझको सौप दे 

      क्या लागे है मेरा..."

                      ... गाण्याचे शेवटचे बोल कानावर पडावे आणि अलगदपणे मृत्यूने मला उचलून न्यावं.ना त्या विधात्याला त्रास व्हावा नाही मला.सगळं कसं संथ आणि शांत.


                                                      - पी.निरंजन

No comments:

Post a Comment

प्रश्न

       दिवसागणीक सरणारी रात्र आता मला छळते आहे. इतका मनस्ताप  कधीच मला झाला नव्हता. संध्याकाळ झाली की मी लिहायला बसायचो आणि सोबत प्यायलासुध्...