Sunday, August 15, 2021

जाग




       कुठल्या तरी अवाढव्य दगडाला धडक बसली आणि मी जागा झालो.डोळे चोळले आणि समोर बघितलं.सूर्याच्या लक्ख प्रकाशाने दाही दिशा उजळून निघाल्या होत्या. हळूहळू प्रकाश ओसरू लागला.समोरच दृश्य स्पष्टपणे दिसल आणि मला हादरा बसला. परत एकदा मी डोळे चोळले पण समोरच दृश्य तेच होत.

     दूरवर पसरलेल्या  सपाट अश्या मैदानात माणसेच माणसे दिसत होती.स्त्री,पुरुष,मुलं ,म्हातारे सर्व सर्व.पण पूर्णतः नग्न.एकाच्याही अंगावर कपडा नव्हता.मला खूप अश्लील आणि गलिच्छ वाटलं.काय आहे हा प्रकार.सर्व एकजात नग्न.मात्र त्यापैकी कुणाच्याच चेहऱ्यावर दुःखाचा साधा लवलेश नव्हता.सर्वजण आंनदि,समाधानी आणि हसत खिदळत दिसत होते.थोडेफार दुःखी सुद्धा होते पण ते दुःख सुद्धा विलक्षण मोहक वाटत होत.पण मला हे फार भयंकर आणि विचित्र वाटलं.आपण वेगळ्या ग्रहावर तर आलो नाही आणि हे सर्व एलियन तर नसावेत.पण ह्यांना तर माणसा सारखेच अवयय आहेत.

हाथ,पाय ,डोळे ,कान,नाक..चित्र विचित्र असे शेपटी बीपटी सारखे अवयव दिसत  नव्हते.भावनाही माणसा सारख्याच होत्या.म्हणजे हे पूर्णपणे माणसच आहेत म्हणायच.मग हे असे उघडे का.?

           माझ डोक ठणकायला लागलं होतं आणि त्यांचे ते नग्न देह बघून काहीस किळसवाण वाटत होत.अचानक माझ्यासमोरून एक माणूस गेला.त्याच्या नजरेला न भिडता मी विचारलं.

 "दादा ही जागा कोणती आहे"

 तो म्हणाला "पृथ्वी" 

मी थोडासा गोंधळून म्हणालो,

"हो, पण पृथ्वीवरची नेमकी कोणती, काय नाव ह्या जागेच" 

"नाव..म्हणजे काय..ही तर पृथ्वी आहे.."

मला थोडं विचित्र वाटलं.मी दुसरा प्रश्न केला.

"तुम्ही कोण..??.

"माणूस"

"ते तर मलाही माहीत आहे हो.पण तुमचं नाव काय,तुम्ही कुठून आलात, तुमचा गाव कोणता, हे सगळं"

"..नाव बिव काही माहीत नाही पण मी माणूस आहे आणि ही पृथ्वीचं माझी जागा,माझं गाव.."

आता तर माझ्या डोक्याला मुंग्या आल्या,

तरी मी नियंत्रण ठेवून विचारलं

"बर तुम्ही कुठल्या जातीचे,धर्म कोणता,देश कोणता."

तो शांतपणे म्हणाला,

"जात..धर्म..देश..ही काय भानगड आहे"

"तुम्हाला हे सर्व माहीत नाही"

त्याने अतिशय निरागसपणे सांगितलं 

"नाही..."

            मला वाटलं एकतर हा माणूस तरी पागल आहे किंवा मी तरी..माझं डोकच बधिर झालं होतं.काय करावं सुचतच नव्हतं..एवढ्यात माझ्या समोरून एक स्त्री गेली.ती सुद्धा पूर्णपणे निर्वस्त्र.

मी थोडासा नजर बाजूला वळवीत त्यांना विचारलं..

'मॅडम तुमचं नाव काय आहे..'

"नाव...म्हणजे.?

"अहो तुमची नेमकी ओळख काय, लोक कशामुळे ओळखतात..", मी चिडून म्हणालो

"स्त्री..फक्त स्त्री"

आता तर मला प्रचंड राग येत होता..

मी कंटाळून म्हटलं ठीक आहे..बर 

"तुमची जात कोणती,धर्म कोणता, प्रांत कोणता..?"

"..हे सर्व काय आहेत..."..तेवढ्याच थंडपणे ती म्हणाली.

             आता मात्र माझी सहनशक्ती संपली. डोक्यावर कुणीतरी घण मारत आहे असं वाटलं..हे सर्व जे सुरू होत ते खरंच माझ्या अकलनापलीकडे जाऊ लागलं.तरी सर्व आवरून मी शेवटचा प्रश्न विचारायच ठरवलं.

"बर ..तुम्ही नेमके करता काय..म्हणजे कुठल काम करता.?"..

मी कितीही नजर वळविण्याचा प्रयत्न केला तरी दृष्टी अधून मधून त्या स्त्रीच्या देहाकडेच जात होती..

ती स्त्री थेटपणे माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली..

"आम्ही..एकमेकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो.."

आता तर खरच मला आपल्याला भास होत आहे असं जाणवायला लागलं..हे सर्व भ्रम आहेत..हे सत्य नाही..मग मी थोडावेळ शांत राहायचं ठरविलं.

एवढ्यात ती स्त्री स्वच्छपणे मला म्हणाली,

"तुमचे डोळे खराब झाले का..की काहीतरी गेलं आहे"

"काय म्हटलत डोळे.."

"हो..मग असे सारखे सारखे इकडे तिकडे ,सैरभर का बघताय .." 

ती सहजपणे बोलून गेली.

"नाहीतर.. डोळे तरी ठीकच आहेत माझे.."

अस बोलून मी डोळ्यांना  हाथ लावला..मला काहीतरी जाणवायला लागल.खूप जड..भक्कम..कठीण अस.हो काहीतरी गेलं असावं..आणि एखाद्या अजस्त्र नागाने डंख मारावा तसा डंख डोळ्यांना बसला.मी पटकन डोळ्यावरून हाथ बाजूला केला.समोर अंधुकसा प्रकाश दिसत होता.मी डोळे नीट चोळले.बघितलं.घर होत.आणि मी बेडवर होतो.अरेच्या हे तर स्वप्न होत..साल काय भयंकर स्वप्न होत..बापरे.जीवच जाते काय अस वाटलं..सुटलो..पण झोपेचा पूर्ण खोळंबा झाला होता..

          एवढ्यात आईचा आवाज आला..

"उठरे लवकर..कॉलेजमध्ये नाही जायच का.?..आज 15 ऑगस्ट आहे न" 

             

                                            - पी.निरंजन


       

No comments:

Post a Comment

प्रश्न

       दिवसागणीक सरणारी रात्र आता मला छळते आहे. इतका मनस्ताप  कधीच मला झाला नव्हता. संध्याकाळ झाली की मी लिहायला बसायचो आणि सोबत प्यायलासुध्...