Sunday, January 16, 2022

प्रश्न




       दिवसागणीक सरणारी रात्र आता मला छळते आहे. इतका मनस्ताप  कधीच मला झाला नव्हता. संध्याकाळ झाली की मी लिहायला बसायचो आणि सोबत प्यायलासुध्दा. हळूहळू रात्र गडद व्हायची आणि माझ लिखाणसुद्धा अधिक वेगाने पुढे सरकायच.पण  अलीकडे रात्रीने आपल जाळ पसरायला सुरुवात केली की मी प्रचंड अस्वस्थ होत असे. कुणीतरी मला जाणीवपूर्वक डीवचत आहे अस वाटायचं. थोडा जरी आवाज आला तरी माझी तंद्री भंग होत असे. कुठलाच आवाज सहन व्हायचा नाही. सातत्याने कुणीतरी पाठीमागे उभ आहे अस वाटायचं. आणि मला हा मुळीच भास वाटत नसे.
       मग मला झोप लागायची नाही. संपूर्ण रात्र, दारू, सिगारेट आणि जीवघेण्या आठवणी सोबत मी काढत/असे. मात्र सकाळ झाली की मला पुनर्जन्म झाल्यासारखा वाटे. दिवसभर माझ्या अंगात चैतन्य सळसळत रहायच. भयंकर उत्साह. सर्व काम मी पटापट करत असे. दुपार झाली, की थोडी सुस्ती चढायची पण संध्याकाळी मात्र पुन्हा उत्साहाचा ज्वर चढायचा. पण जसजशी रात्र जवळ यायची तसतसा माझा एकेक अवयव बधीर होत असे. एखाद्या सरणावर पडलेल्या निपचीत कलेवरासारखी स्थिती व्हायची. काही काळानंतर  ही अवस्था दिवसासुद्धा निर्माण व्हायला लागली. मी घराचे दार, खिडक्या बंद केल्या. सर्व दिवे पेटवले. आणि स्वस्थ बसलो. पण चित्त काही ठिकाणावर नव्हत. मेंदूत काहीतरी गुप्तपणे खळबळ माजली होती. हळूहळू अन्नावरूनसुद्धा वासना उडाली.पूर्वी दोन वेळेस भरपेट जेवण करत असे. नंतर एक वेळ. नंतर फक्त नाश्ता. आता फक्त दारू आणि पाणी. जीर्ण झालेल्या बुद्धासारखी स्थिती झाली होती.
      त्या रात्री तर कहरच झाला. मी शांतपणे लिहायला बसलो. साधारणत: रात्रीचे दोनेक वाजले असतील. दोन तीन पान लिहीले आणि मला आवाज ऐकू आला..प्रश्न...मी खिडकीतून बाहेर पाहील. अंधाराच स्मशान झाल होत. चिटपाखरूसुद्धा नव्हत. मी परत लिहायला बसलो. थोडावेळ गेला. परत आवाज आला..प्रश्न.. प्रश्न. मी स्तब्ध झालो. इतक्या रात्री कोण ओरडत असेल. मी लेखणी बाजूला ठेवली. आणि दारूचा घोट घेतला. परत आवाज.. 'प्रश्न'. आता मी पिसाळलो. खुचीवरून उठलो. सगळीकडे शोधाशोध केली. पण आवाजाच उगमस्थान सापडल नाही. सिगारेट पेटवली आणि धूर सोडू लागलो..प्रश्न..प्रश्न...प्रश्न...प्रश्न.. कुणीतरी डोक्यावर घणाने प्रहार करीत आहे अस जाणवल. मी गच्च डोक दाबल  आणि मटकन खाली बसलो. कानावर हाथ ठेवले.. काहीवेळ नीरव शांतता. हळूच कानावरून हाथ बाजूला केला. बॉम्बस्फोट झाल्यासारखा आवाज कानी पडला ..प्रश्न..प्रश्न... आवाजाचा प्रतिध्वनी कानात घुमू लागला..ह्या आवाजाने मी अक्षरशः बेजार झालो.  काही सुचत नव्हतं..आता आदळआपट करून काही होणार नव्हतं..मी शांतपणे विचार करायचा ठरवलं. थोड्यावेळाने आवाज आला.. प्रश्न...प्रश्न..मी विचार करू लागलो.. पण कोणता प्रश्न आणि प्रश्न कुठलाही असला तरी उत्तर मला केव्हाचच सापडल आहे. कधीचाच मी उत्तरापर्यंत पोहचलो आहे..
       थोड्यावेळ गहण शांतता पसरली. आणी हळूच आवाज कानी पडला...प्रश्नच ...आता मात्र माझे पाय जमिनीला चिकटले. सार शरीर जड झाल. डोळ्यापुढे अंधार दाटला. डोक्यात विचाराच वावटळ उठल. प्रश्नच अजून बाकी आहे. अजूनही..मग माझ्याकडे काय आहे.. इथ मी सुन्न झालो. सार शरीर लुळ पडल. माझ्यातली चेतनाच हरवली. जमीनीतून अतिशय त्वेषाने ज्वालामुखी बाहेर यावा तशी एक तीव्र लाट देहात उसळली. मी दारुचा घोट घेतला, सिगारेटचा धूर सोडला. खिडकीजवळ आलो काळाकुट्ट अंधार. एक शब्द बाहेर आला.. प्रश्न... मी धाडकन खिडकीतून बाहेर उडी टाकली.

                                                          - पी. निरंजन 

2 comments:

प्रश्न

       दिवसागणीक सरणारी रात्र आता मला छळते आहे. इतका मनस्ताप  कधीच मला झाला नव्हता. संध्याकाळ झाली की मी लिहायला बसायचो आणि सोबत प्यायलासुध्...