Tuesday, November 10, 2020

चिरविश्रांती

 


 


 

            आज जेव्हा कधी भूतकाळाच्या गोधडीत मी शिरतो. तेव्हा निसटलेल्या क्षणाची काजळी डोळ्यात साचते. तू गेल्यापासून जवळपास चाळीस वर्षे ह्या अनोळखी रात्रीचा मी धनी झालो.पत्त्यांच्या डावाप्रमाणे आयुष्याची घडी विस्कळीत            झाली .आठवणीचे वारस तेवढे शिल्लक आहेत.तीन भेटींच्या  पलीकडे आहे तो फक्त पूर्णविराम.कधी कधी प्रश्न पडतो पहिल्या  भेटीपासूनच आपण तुटत गेलो का?

        बी.ए च शेवटचं वर्ष.आपली अंतिम परीक्षा जवळ आली तेव्हा मी थोडासा नाराज झालो. कॉलेजचं जीवन संपणार ह्याची घंटा वाजली होती. इतिहासाचा अखेरचा पेपर देऊन मी परतू लागलो.लाकडी पूल दिसताच मनाला हायस वाटलं.पूल ज्या ठिकाणी जमिनीला स्पर्श करतो त्यापासून थोड्या अंतरावर गंगाराम काकांची चहाची टपरी  आहे .तिथे चहा पिताना पुलाखालाची वासंती नदी बघून मन हंसासारखं मोहरून जात असे.आभाळ हळूहळू काळवंडू लागलं.वादळ येण्याची शक्यता वाटू लागली.मी लगबगीने पावले टाकू लागलो. समोरून कुणीतरी येत असल्याचा भास झाला.मी बघीतल, समोरून कस्तुरी येत होती.पांढराशुभ्र सलवार घालून नुकतीच एखादी परी अवतरल्याचा भास जाणवत होता. पण कुणास ठावूक ती दिसल्यावर मनात प्रचंड खळबळ माजत असे.तिची माझी नजरानजर झाली.मी काहीसा कचरलो,ती पुढे आली.                                      

" वसंत पेपर कसा गेला "                                                         तिने कपाळावर आलेली केसाची बट मागे सारत विचारलं.             मी तिच्याकडे बघू लागलो.गौरवर्ण चेहरा,कौलारू भुवया, आकाशगंगेसारखे डोळे आणि दुमडलेले ओठ.एकप्रकारची तेजस्वी शांतता तिच्या चेहऱ्यावर पसरलेली होती.

" छान. तुझा " मी बोलता झालो.

" बऱ्यापैकी " तिने माझ्या डोळ्यात बघितले.

" तुला चहा प्यायला आवडेल " ती म्हणाली.

" तुला आवडणार नाही "

  मी दोन चहा मागितले.

" मी गावाला जाणार आहे " तिने चहाचा घोट घेतला.

" कायमची..." चहाची प्रखर उष्णता तोंडाला भाजत गेली.

" तू थांबवू शकतोस " तिचे शब्द आचके देऊ लागले.

" काका किती पैसे झालेत " ती पैसे द्यायला गेली.

  माझे डोळे पाणावले होते.

" परत येशील ना " मी विचारलं.

" तू थांबशील "

  आणि ती ऑटोत बसली.


            भूतकाळात प्रवेश करण्याची ताकद असती तर मी ह्या ठिकाणी नक्कीच वापरली असती.वास्तविक पाहता माझ्या आयुष्याची सुरुवातच अखेरीस झाली. तिच्या जाण्याची जखम दिवसेंदिवस चिघळत गेली. पाच वर्षाच्या वियोगात प्रीतीच्या अग्निकुंडात मी भाजून निघालो.तीला जाऊ दिल्यापासूनच ती मला हवीहवीशी वाटू लागली.तिच्या शेवटच्या शब्दावर माझे अश्रू बाहेर आले,तेव्हा ती ऑटोत बसली.हा संकेत होता दुसऱ्या भेटीचा.

              दरवाजावर थाप पडली.मी बाहेर आलो.कस्तुरी उभी     होती.नववधुसारखी भासत होती.नाही ती नववधूच होती.तिने लग्नाची निमंत्रण पत्रिका समोर केली.

" एकटाच राहतोस ".. ती सोफ्यावर बसली

" तू गेल्यापासून ".....मी उत्तरलो

" पाणी घे "....मी ग्लास समोर केला 

  तिने डोळे पुसले.

" अखेर तू आलीसच "

" हो ".. तिचे अश्रू निरागस भासले

" पण मी तर केव्हाचा थांबून होतो..... "

 

  


               तुटण्याची शृंखला पहिल्या भेटीपासून सुरू झाली तरी मोडल्या मात्र दुसऱ्या भेटीत गेलो. त्यांनतर येणारी प्रत्येक रात्र मृत्यूचा पेला घेऊन येते व तो मी हसतमुखाने प्राशन करतो .जवळपास रोजच मरणाचे घडे साठवीत होतो.कुठलाच ताळेबंद मी बांधू शकत नव्हतो ना तीच्या भेटण्याचा ना जाण्याचा.ज्यावेळी तिने घराचा उंबरठा ओलांडला त्यावेळी माझ्या शरीराने प्राण सोडला.

          मुसळधार पावसाने हैरान  केल होत .मी कितीदा तरी दार लावलो तरी वादळी पावसाने ते उघडूच लागलं.एक जोराची वीज कडाडली आणि पटदिशी दरवाजा उघडला.मी तडक दार लावण्यास गेलो. समोर कस्तुरी.

"आत घेशील "                                                                   पावसाने तीच सर्वांग भिजल होत चेहऱ्यावरून पावसाचे थेंब ओघळून खाली पडू लागले.मी तिला आत घेतलं सोफ्यावर बसविल 

" तू बैस इथं मी टॉवेल घेऊन येतो "..                                              

" नको असू दे " 

" अग सर्दी होईल आजाराने ग्रस्त होशील "

" नाही फक्त तू इथं बैस "

तिने माझा हाथ पकडला. मी तिच्याकडे पाहिलं, नयनात असलेल्या व्याकुळतेची तीव्रता मला सहन झाली नाही.

मी खाली बसलो.

" जवळ येऊ बस ना "

तिने माझा हाथ अजून पण सोडला नव्हता.

" मला मिठी मारू शकतोस "

पौर्णिमेच्या चांदनी प्रमाणे तिची चर्या झळाळू लागली.

" मला अधिकार आहे "

" हो फक्त तुलाच आहे "

   

            मी तिला बाहुत घेतलं. महादेवाचा तांडव निद्रिस्त झाल्यासारखा वाटला.महासागराला चिरविश्रांती लाभली होती. तिच्या शरिराचा प्रत्येक अवयव माझ्या शरीरात प्रवेश करु लागला. ते आता अवयव नसून स्वतंत्र आत्मे झाले होते.मी तिच्या केसांवरून हाथ फिरविला. वादळ शमल होत.मृत्यूने केव्हाच तिला आपलस केलं होतं.


              निसर्गा ! कुठल्या पापाची फळे मी भोगत आहे ! कुठल्या ! तूच या खेळाचा सूत्रधार आहेस तर आम्हाला डाव का मांडू दिलास ! अर्ध्यातच खेळ संपवायचा होता तर एकाचाच बळी का ! ही सततची नरक यातना माझ्याच वाट्याला का ! नाही रे नाही सहन होत आहे ही कुचंबणा ! आता तरी मला निर्वाणाचा शाप दे रे ! होऊ दे एकदाची ह्या दुबळ्या देहाची राखरांगोळी ! मिळू दे परत एकदा चीरविश्रांती ! चिरविश्रांती !



Saturday, October 17, 2020

मी थकलो आहे इंद्रायणी



मला जाणवलेल कुठलं सत्य मी तुला सांगू

की नुसताच बघत राहू तुझ्या देहाकडे,

देहातून निघणाऱ्या प्रत्येक सम्भोगाकडे

हे असं प्रेत लटकविलेल्या झाडासारखं

 घट्ट राहन असह्य होतंय

रिकामी झालेली वाट माणसं तुडवल्या सारखी वाटतेय

फाटक बंद, दारे बंद, माणसे बंद, त्यांची मने बंद,

सार काही बंद

बेबंद होत गेलेला प्रत्येक टाहो सुद्धा बंद,

तुला माहित आहे फाशीवर लटकलेल्या

 माणसाचे पाय कसे फडफडतात,

तशीच फडफड काळजात भिनतेय,

मी थकलो आहे आता इंद्रायणी..खरचं थकलो आहे

लिहून लिहून कोड झालेली माझी बोटे झडू लागली आहेत,

माझी हरेक जाणीव बधीर होतेय

तुला पाहण,तुझ्यावर प्रेम करणं,तुला उसवण,तुला प्रसवण

सार काही थंड पडत आहे, सैल होत जाणाऱ्या  

मिठीसारखं....

इंद्रायणी.......,खरंच मी थकलो आहे

युगानुयुगे चाललेली जीवाची कुतरओढ 

आता थांबू पाहतेय.....तू सांग

मी संपवू का स्वतःला ,नष्ट करू का,

कि येऊ तुझ्याकडे,

तुझ्यातल्या प्रत्येक अंशाकडे.....परत,

देशील मला पुनर्जन्म 

वासनेच्या मंथनातून विझलेला अग्नी ठेवशील माझ्या जिभेवर,

मला विश्वास आहे..

तू हे करशील...

तू नक्कीच हे करशील,

मला संपविताना तू सुद्धा संपशीलच ना हळूहळू


Sunday, October 11, 2020

गंधार

    

           गंधार



गंधार संध्याकाळी मेला. सायंकाळचा संधीप्रकाश त्याच्या चेहऱ्यावरून सरकत संपूर्ण शरीरभर वाहू लागला.मध्यरात्री अबोल असलेल्या समुद्र सारखा तो निश्चल पडून होता.झोपेतच मेल्याने अजूनही जिवंत वाटत होता.स्वतःला वाचविण्याचा कसलाच आटापिटा त्याने केला नव्हता.त्याची खोलीसुद्धा समाधीत मग्न असलेल्या तपसव्या सारखी भासत होती.विलक्षण शांत.तरीपण एक भेसूर ताण वातावरणात जाणवत होता...

      आम्ही त्याला बेडवरून कपड्यानिशी उचललं.कपड्याला दारूचा वास येत होता.आम्ही चटईवर त्याचा देह ठेवला.आता ह्या देहाला नाव नव्हतं.फक्त तो रक्तामांसाचा गोळा होता.मी बराच वेळ खोलीत सैरभर पाहत होतो.तोपर्यंत त्याचे पाहुणे आले.मोजकेच.त्यांचा आकांताचा विधी सुरू झाला.मी चहा प्यायला गेलो.माणूस मेल्यानंतर घरात लावणार संगीत मला खूप डसंत.ते आतड पिळवटणार संगीत एकल तर खरच जीव द्यावासा वाटतो.माणसाचा मृत्यू हा एक सोहळाच पण हया सोहळ्यात असल भयाण संगीत नको. चहा संपला.मी गंधार सोबत घालविलेलं दिवस आठवायचा प्रयत्न करू लागलो पण ते आठवतच नव्हते.अखेरीस घराकडे वळलो.

            त्याचे एक दोन नातेवाईक प्रेत पायऱ्यांवरून खाली उतरवीत होते.मी पुढे झालो,सावकाशपणे त्याच प्रेत गाडीत ठेवलं आणि आत बसलो. प्रेताभोवती पांढरा कापड गुंडाळला होता.आज पहिल्यांदा  त्याच्या अंगावर कपडे खुलुन दिसत होते.तशी त्याला कपडे लागले नाहीत.म्यानातून काढलेल्या नंग्या तलवारीप्रमाणे तो जगला.पांढरा रंग शांतीच प्रतीक समजल्या जाते. किती भयंकर आहे ना माणूस मेल्यावर त्याला शांत झालेलं समजणं.

            स्मशान आलं .सरण आधीच रचलं होतं.सरणाच्या बाजूला दुसरं एक प्रेत जळत होत,ते एका लहान मुलांच प्रेत होत त्याच्या बाजूलाच एक बाई होती,ती त्या मुलाची आई असावी. छाती पिळवटून रडत होती.अतिशय आकांडतांडव.पण ती कुणासाठी रडत असावी?..सगळीकडे तर प्रेतेच जळत होती.थोड्या वेळानंतर गंधारचा देह सरणावर ठेवण्यात आला .रॉकेलचे शिंतोडे उडविण्यात आले आणि आगीने पेटलेली कडी  सरणाला लावली.जंगलाला लावलेल्या वणव्यासारख सरण जळू लागल.लालभडक आगीच्या लोळाने गंधारला गिळल.खूप वेळेपर्यंत सरण जळत होत.हळूहळू लोकसुद्धा निघू लागली .एवढ्यात एकजण माझ्यापाशी आला.आणि म्हणाला कवटी फुटली तुम्हीसुद्धा निघा.मला आश्चर्य वाटलं मला कसलाच आवाज आला नाही.अशावेळी काहीतरी फुटू शकते हे मला कस जाणवलं नाही. तसही आता थांबण्यात काही बाकी नव्हतं.

         राख उरेल पण कुणाचीही राख झालेली मला बघवल्या गेलं नसत.मी स्मशानातून बाहेर आलो.संध्याकाळच रात्रीत रूपांतर झाल होतं आणि रात्र अतिशय फुलून आली होती.बाळंत झालेल्या एका नववधू सारखी.

Saturday, October 3, 2020

आकांत



रात्रीला प्रियकर असता तर रात्र मला कधीच आवडली नसती.
तू निघून गेलीस आणि हि रात्र माझी सोबतीण झाली.
मात्र तूझ्या जाण्याची जखम अजूनही वाहतच आहे.
काय भयाण वाटायचं मला त्यावेळी.सतत नजरेसमोर एकटक बघणं आणि सांडलेल्या अश्रूंचा ताजमहाल बनविन...
जिव्हारी लागायचं..हाथातली सिगारेट चटका लागेपर्यंत जळत रहायची.आणि पोटात गेलेली दारू साऱ्या अंगभर 
नागिनच विष बनून भिणायची.वासनाच उरली नव्हती कुठली.
सार काही थंड झालं होतं.घेत असलेला श्वास सुद्धा थकायला लागला होता.खिडकीबाहेरच्या गुलमोहराकडे सतत बघत बसेे.
वैशाखाच्या कडक उन्हाने गुलमोहराची पाने झडू लागली होती.मी सुद्धा असाच झडत होतो गळत होतो. अश्यावेळी ग्रेसांचे समुद्री डोळे आठवायचे.सांजप्रहरी पृथ्वीवरून निरोप घेणाऱ्या सूर्याकडे ते जेव्हा बघतात.तेव्हा,ते बघणे मला माझ्या देहातून आरपार जाणारे वाटते.ग्रेसांच्या दृष्टीत व्याकुळलेला अश्वत्थामाच दिसायचा.
आणि त्यांच्या दोन ओळी मला आठवायच्या,

" अशी ओल जाता
 तुझ्या स्पंदनातून
 आकांत माझ्या  
 उरी केवढा "..

हाच आकांत माझ्यात संक्रांत झाला.
तुझ्या आठवणींच्या स्फोटात रोज मी उध्वस्त होतो.
आता आकांत आणि एकांत ह्याखेरीज काहीच शिल्लक उरलं नव्हतं.तुला आठवत तू सतत बोलायचीस आणि मी कायम अबोल असे.आता तर अंतर्मुख झालो आहे.एकदा तर हेमिंगवेच येऊन बसला,उशा जवळ .त्याच्या शॉटगनची नळी माझ्या डोक्याकडे वळली आणि तो म्हणाला,पुरुषोत्तमा बघ एकदा हि शॉटगन स्वतःवर रोखून निर्वाणाचे प्रतिध्वनी ऐकू येतील.खरंच ..तोच स्वतःला मारू शकतो.फक्त तोच.....आम्ही तर उत्तर भेटूनहि प्रश्नाला चिकटणारे किडे. पण कुणास ठाऊक नेहमी वाटत काही तरी बाकी आहे.हेमिंगवेची शॉटगन आणि ग्रेसचे डोळे सतत सभोवार रेंगाळतात.स्वतःला पोखरून काढतात.
आता वाटत तुझ्या नागड्या देहाला भिडण्याची दृष्टी नक्कीच लाभेल...

                     

प्रश्न

       दिवसागणीक सरणारी रात्र आता मला छळते आहे. इतका मनस्ताप  कधीच मला झाला नव्हता. संध्याकाळ झाली की मी लिहायला बसायचो आणि सोबत प्यायलासुध्...