Sunday, July 4, 2021

काळोख

 


       

       वेदना मर्त्य असते का?..कि,चिरंतन असते? मला दोन्हीही पोकळ वाटते.वेदना फक्त असते.तीच असणच तिला अस्तित्व प्राप्त करून देत.तिला बोलकी करत.वेदनेच वाहण मला जिवंतपणाच लक्षण वाटत.जसजशी ती शरीरातून झिरपत जाते तसतसा माणसाला आकार येतो आणि त्यातूनच त्याचा प्रवास निराकाराकडे सुरु होतो.

       मी नैराश्याने ठार वेडा झालो आणि मला वेदना आवडू लागली.ठसठसणारी प्रत्येक जखम मला पुनर्जन्म देऊ लागली.काळीज चिरणारी प्रत्येक गोष्ट मला हवीहवीशी वाटू लागली.मला दान हव होत स्वत:ला जीर्ण करण्याच.स्वत:ला मुळापासून उपसण्याच...इंद्रायणी सोडून गेली आणि मी पहिल्यांदा जखमी झालो.भर पावसात ती गेली.मागे पडलेला अथांग असा वैराण प्रदेश ती सोडून चालली होती.ना तिला कसली भ्रांत होती नाही शोकांत.मात्र मी धारोष्ण रक्तात पडलेल्या कलेवरासारखा झालो.कोसळत्या पावसाकडे बघण्याशिवाय काहीच करू शकत नव्हतो.ती निघून जाणार असती तर मी प्रतिकार केला असता.पण ती सोडून जात होती.निघून जाणाऱ्या प्रवाशाला रस्ता माहित नसतो.मात्र सोडून जाणारा प्रवासी  आधीच रस्ता आखून जातो.

       मी दुसऱ्यांदा जखमी झालो.मात्र हि जखम पूर्ण देहाला नासवून गेली.अश्याच एका अशांत संध्याकाळी मी लिहायला बसलो.माझ्या एका हाथात लेखणी आणि दुसऱ्या हाथात सिगारेट व टेबलावर दारूची बॉटल..आणि समोर होता,घनदाट पसरलेला अमित काळोख.मी लेखणी हाथात घेतली आणि लिहू लागलो.एक शब्द,दोन शब्द...तीन...चार...पाच...सहा....सात..आणि लेखणी थांबली..बोट जणू लुळे पडले होते.एकही शब्द लिहीन जमेना.मी नुसत्या रेघोट्या मारत होतो.चित्र विचित्र रेखाटन काढू लागलो.काहीच सुचत नव्हत.मी गच्च डोक दाबल.आणि त्या भयाण काळोखाकडे पाहिलं.विराट काळोख..काळाकभिन्न.हाच  काळोख माझ्या डोळ्यात साचला.कागदाचा पांढरा रंग आणि रात्रीचा काळा रंग डोळ्यात उतरला.आणि मेंदूत तुफान उसळल.विचारांचे जथेच्या जथे मेंदूला धडका देऊ लागले.कृष्णविवराच्या अवकाशात पसरलेली माणवाच्या चिरंतन दुखा:ला आश्वस्त करणारी अस्वस्थता.कुरुक्षेत्रात मरून पडलेल्या असंख्य देहाला अमर करणारी जाज्वल्य ज्योत.लसलसस्त्या दैन्यातून मुक्त करणारी भडाग्नी.पार्थिव आणि अपार्थिव सीमारेषेवरून हळूहळू सरकणाऱ्या कित्येक जीवघेण्या उल्का माझ्या शरीरात प्रवेश करू लागल्या.माझ्या शरीरात एक अनामिक चैतन्य दाटल.हा हा म्हणता म्हणता मला असंख्य भास पडू लागले.चित्रविचित्र स्वप्नाने माझे डोळे लाल झाले.नसा तटतटू लागल्या.साऱ्या शरीराला वणवा लागल आणि त्याच क्षणी मी वेडा झालो.ठार वेडा.

         आयुष्यभर लिहिलेलं लिखाण मी जाळून टाकल.घरालासुद्धा आग लावली आणि पळत  सुटलो.खूप जोराने.धावणारे पाय आणि उसळणारा श्वास ह्याखेरीज काहीच जाणवत नव्हत. 


                                                        - पी.निरंजन      

Monday, June 28, 2021

एक अनाहूत पत्र

                       



डीअर मारिया,

          

              तु खूप आठवतेस.असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी तुझ्या आठवणीच युद्ध उसळल नसेल.तुला जेवढ आठवावं तेवढी तु ताजी होतेस.मात्र हे ताजेपण मला उध्वस्थ करत.भग्न करत.आठवणीच्या श्रापातून मुक्त होण्याचा मूलमंत्र सापडेपर्यंत हि मालिका अशीच सुरु राहील.

            आता तर रात्रसुद्धा जखमी नागिनीप्रमाणे डसते.काल रात्रीची गोष्ट.मी झोपण्यासाठी डोळे मिटले आणि नेहमीप्रमाणे डोक्यात विचारच वावटळ उठल.एक विचार आकाशात सोडलेल्या रॉकेटप्रमाणे मेंदूत घुसला कि आज मला झोपच येणार नाही.काय फालतू विचार होता .पण खरं सांगतो.रात्रभर वेड लागलेल्या रुग्णासारखा छताकडे पाहत राहिलो.सतरा वेळ खोलीमधून चकरा मारू लागलो.पळून जावस वाटत होत,लगेच कुठेही आणि अतिशय वेगाने कुणाचा तरी खून करावासा वाटत होता.पॉल गोगीणला मारायला हाथात सुरा घेऊन धावणाऱ्या व्हान गोघसारख.माणसाला थंड करणारी हिंसा असेल तर ती मी नक्की करेल.बाहेर अंधारच स्मशान झाल होत आणि माझ्या डोळ्यात रणांगणात सांडलेल्या रक्ताची विराट शांतता.डोक्यात उठलेल्या विचाराच्या जथ्याला मरण नाही,हे कळल.दुसऱ्या दिवशी मनोवैज्ञानिकाकडे गेलो.ठणठणीत बरा असल्याच प्रमाणपत्र दिल.शुद्ध फसवेगिरी होती.जगण्याच्या अपार्थिव हेतूला वणवा लावण्याचा प्रयत्न होता.पण मी स्वत:शी प्रामाणिक राहण्याचं ठरवील.

           तुटलेल्या पैंजणातून निघणाऱ्या हुंद्क्याप्रमाणे माझ्यातील वेदना वाहू लागली.माणसातून उठण्याची प्रत्येक विधी मी पार पडली होती.आता वाट पाहण असह्य होत.हाका कानावर येण्याच्या आधी मी पळत सुटलो.कुठे कधीपर्यंत,कितीवेळ अश्या मर्यादेच वर्तुळ नव्हत.फक्त अपरिमित पसरलेल्या बेटावरच शेवाळ तेवढ बाकी होत.फक्त शेवाळ.मी हाथाने बाजूला ढकलीत त्या उमलत्या गर्भातून चालू लागलो.मारिया हे....अस चालण मला खूप आवडत.फक्त चालण.रस्तासुद्धा नको वाटत.तो जरी कुठे संपत नसला तरी त्याची सुरुवात कुठून तरी झालेलीच असते.

           तुला माहित असेलच,पॅरिसच्या एका नाईटक्लबमध्ये पहिल्यांदा तू मला दिसलीस आणि मला निखाऱ्यावरून चालण पसंत पडल.तुझ्या हाथातील व्हिस्कीचा ग्लास मला मरणघरातून आणलेला लामणदिवा वाटतो.ज्याची एक ज्योत माझ्या पाठीच्या मणक्यात बांधलेली आहे आणि दुसरी ज्योत तुझ्या.तिकडे तू,तो ओठाला लावावा आणि इकडे मला मृत्यूने रसरसलेल चुंबन मिळावं..

          

          “ कौनसी जंजीर थी

             इन आंखो मे 

             शायद एक नशा था 

             जानलेवा...”

     

       मारिया,खरच संपल्यानंतर येणारा मुक्तपणा कुठल्या स्वातंत्र्याचा समानार्थी शब्द असेल,मला वाटत नसेलच बहुतेक.


                                                     तुझाच,

                                                 ..पुरुषोत्तम 


                                                         -पी. निरंजन

                           

Tuesday, March 30, 2021

दुःखाची संगती

 



             काही दिवसापूर्वीची गोष्ट, मी बी ए. तृतीय वर्षाच्या मुलांना मराठी शिकवीत होतो.विद्याधर पुंडलिकांची 'चक्र' नावाची एकांकिका अभ्यासक्रमात होती.'चक्र' ही महाभारतातील विविध व्यक्तिरेखेवर आधारलेली एकांकिका आहे.त्यातील द्रौपदीची व्यक्तिरेखा माझ्या मनाला भयंकर चटका लावून गेली.द्रौपदीने म्हटलेली दोन वाक्य आजतागायत माझ्या काळजाला पोखरत आहेत.एके ठिकाणी द्रौपदी भीमाला म्हणते,"मला माझ्या दुःखाची संगती कळली पाहिजे".दुसर वाक्य,"शेवटी धर्म आणि अधर्मापेक्षा, कर्म आणि अकर्मापेक्षा दुःखच खर आहे".

        ह्या दोन्ही वाक्यातून दुःख या आदिम व सनातन मानवी भावनेच अचूक विश्लेषण करण्यात आलेल आहे.पहिल्या वाक्यात  द्रौपदी म्हणते,दुःखाची संगती.मला स्वतःला संगती हा शब्द फार म्हणजे फार आवडला.दुःखाच्या अर्थप्रकटीकरणासाठी संगती शिवाय अन्य कुठलाही शब्द तेवढा सखोल व परिपुर्ण वाटला नसता.ह्या एकाच शब्दाने मला पुंडलिकाप्रति आसक्ती निर्माण झाली.महाभारतात दोन अश्या व्यक्तिरेखा आहेत ज्या दुःख,वेदनेने सर्वाधिक होरपळुन निघाल्या आहेत.एक म्हणजे द्रौपदी,दुसरा म्हणजे अश्वथामा.महाभारतातील नृशंस युद्धाची निर्मिती सूडभावनेतून झाली.प्रत्येकाच्या मनात ह्या सुडाने हैदोस माजविला होता. द्रौपदीच्या मनातही हा सूड हळूहळू हाथपाय पसरत होता.मात्र ह्यामागे तिच्या काळजाला ज्याअसंख्य जखमा झाल्यात त्या कारणीभूत आहेत.भरसभेत द्रौपदीची झालेली विटंबना आणि युद्धाच्या अखेरीस क्रूरपणे अश्वत्थाम्याने द्रौपदीची मारलेली पाचही मुलं. ह्या सर्व घटनेमुळे द्रौपदीच्या वाट्याला आलेलं दुख हे अतिशय संहारक आणि भेदक होत.तिच्यातल्या स्त्रीत्वाचा आणि मातृत्वाचा निर्घृण खून करण्यात आला.त्यामूळेच द्रौपदी पिसाळली, दुःखाने अंध झाली.शेवटी तिने ह्यावर उतारा म्हणून भिमाकडे अश्वत्थाम्याचा सूड मागितला.आणि ह्यातूनच अश्वत्थाम्याला कधीही भरून न निघणारी लसलसती झखम झाली.हा सर्व विनाश झाल्यावर बराच अवकाश निघून गेला,काळ निघून गेला.आता द्रौपदीला नव्याने काही प्रश्न पडत अहेत.ती म्हणते,"मला खरंच माझ्या दुःखाची संगती कळली का?",मला जे मिळालं ते समाधानकारक आहे का? माझ्या दुःखाच खरोखर निवारण झालं का? आणि ह्या तडफडण्याला एकच उत्तर मिळाल..'नाही'.

       आता मला प्रश्न पडतो,खरंच काय असेल दुःखाची संगती? कोणता चेहरा आहे दुःखाचा?...आणि असंख्य विचाराच्या मंथन केल्यावर  काही धागेदोरे हाथी लागतात.जे उत्तराच्या जवळ पोहचवितात.दुःखाच्या उत्पत्तीनंतर माणूस ते निवारणाच्या मागे लागतो. त्यावर उपाय शोधतो. मात्र ह्या भानगडीत तो दुःखाला पुरेपूर समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. ह्यामुळेच दुःख नेहमीकरता दूर होत नाही,तर ते रूपांतरित होत.पाण्यासारख.अवस्था बदलतात तीव्रता तेवढीच राहते.म्हणूनच जस एखाद्या आजारा मागील कारणे शोधल्यास त्या आजाराचं योग्य निदान करता येत.तसच दुःखाची नेमकी कारणे आणि त्याच स्वरूप कळलं तरच त्याचा नेमका अर्थ कळतो.इथं द्रौपदीला तिच्या दुःखावर उपाय नको होता.तिला फक्त तीच दुःख व त्याचा अर्थ कळायला हवा. त्यासाठीच ती जीवाचा आकांत करत होती. प्रत्येक दुःखाला, वेदनेला विशिष्ट खोली,मर्यादा व वेग असतो.त्या दुःखाची तीव्रता आणि सीमा माणसाला दुःखाच्या अधिक जवळ नेते.प्रेमात येणारा विरह,प्रियजनाचा मृत्यू,शारीरिक जखमा,अपयश ह्या सर्वतून उद्भवणाऱ्या प्रत्येक दुःखाला विशिष्ट असा आकार व खोली आहे. प्रेमातून निर्माण झालेल विरहाच दुःख दोघांसाठी सारखं आणि समप्रमाणात असत.मात्र एकतर्फी प्रेमातून आलेलं दुःख एकापूरत मर्यादित असत.तसच मृत्यूतून निर्माण होणार दुःख,त्याला ना मर्यादा आहे नाही ते चिरंतन आहे, ते फक्त अटळ आणि शाश्वत आहे.अश्या प्रत्येक दुःखाच्या विविध पातळ्याच्या रुपरेषेवरून दुःखाच एक प्रतिबिंब तयार होत.आणि मग आपण ठामपणे सांगू शकतो की हाच आहे दुखाचा मूळ अर्थ आहे.

          ह्या सर्व भौतिक पाठपुराव्याचा कसून विचार केला त्यावर सखोल चिंतन मंथन केल्यानंतर,आता ह्यापुढचा प्रश्न उपस्थित होतो,मग दुःख निवारण्याचा उपाय कोणता? परत एकदा विचारांचे घोडे धावायला लागतात.आणि बऱ्याच वैचारिक घुसळणीतून काही सूत्र माझ्या हाथी लागले.आणि मला दुःखाच एक नवीन रूप समोर दिसायला लागल.वेगाने एक विचार डोक्यात उसळला दुःखाच्या अटळ,अनाकलनीय,व अविनाशी ह्या गुणधर्मातच त्याच्या मुक्तीचा मूलमंत्र दडलेला नसेल का?.आणि मग मला द्रौपदीच दुसरं वाक्य आठवलं," धर्म आणि अधर्मापेक्षा व कर्म आणि अकर्मापेक्षा दुःखच खर आहे".इथं मला तीव्रतेने बुद्ध आठवला.आणि शतकानुशतके चालत आलेल्या ह्या मानवी वेदनेचा संग्राम निश्चितपणे थांबवता येईल असं वाटलं.

            महाभारतातील युद्धात प्रत्येकजण अधर्माने वागला .सर्वांनी वाईट व अनैतिक मार्गाचा अवलंब केला. पण एवढं सगळं होऊनसुद्धा कुणालाच आत्मिक समाधान लाभलं नाही.वाट्याला आलं ते रक्ताने माखलेल भळभळत दुःख.ह्यातूनच द्रौपदीला शाश्वत सत्याचा साक्षात्कार झाला.आणि त्याच्याच प्रत्यय म्हणजे तीन उद्गारलेलं दुसरं वाक्य.दुःखाच एकमेव,अंतिम,चिरंतन व अटळ असणं हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.बुद्धाने आपल्या जगण्यातून, भोगातून हेच सांगितलं. तेच सत्य व्यासाने अधोरेखित केल आहे.आता मला प्रश्न पडतो जर दुःख अंतिम, अटळ व चिरंतन असेल तर त्यावर चिरकाल टिकणारा उपाय, इलाज असेल का? असू शकतो का? आणि त्याच प्रामाणिक उत्तर आहे,"नाही".दुःखाच अंतिम,अटळ व चिरंतन असणंच त्याच्या अस्तित्वाची सीमारेषा निश्चित करत.आणि एक ज्वलंत व कठोर सत्य हाथात येत,ते म्हणजे दुःखावर अंतिम उपाय नाही. तो असूच शकत नाही,दुःख हे रूपांतरित होत ते नष्ट होत नाही. जसा अश्वत्थाम्याला अमरत्वाचा वरदान असतो तसाच दुःखालाही अमरत्वाचा वरदान लाभलेला आहे.त्यामुळे दुःख हे दूर करण्यासाठी नसून ते मनसोक्त भोगण्यासाठी,जगण्यासाठी आहे.जस सुखाशी आपण आत्म्याच्या देठापासून समरस होतो तसच  दुःखाशी समरस व्हायला हवं.तेव्हा कुठं हा जीवन नावाचा जुगार आनंदाने खेळता येतो. खुप दीवसाआधी लिहिलेलं माझंच एक वाक्य मला आठवत ,'प्रवासाचा शेवट न होणं हेच अंतिम सत्य आहे'.ह्याप्रमाणेच दुःखाच्या अपूर्णत्वा मध्येच त्याच्या पूर्णत्वाची संजीवनी दडलेली आहे..आणि हीच दुःखाची एकमेव व शाश्वत संगती आहे..


                                                            - पी.निरंजन


Wednesday, December 23, 2020

कट्यार

 


       संपल सार...अखेरचं मरण सुद्धा लवकर आलं...                      किती जगायच होत मला किती पहायचं होत...                                पण सार मातीमोल झालं...स्वतःलाच चिरताना कित्येकाचे गळे कापलेत मी...माझं मलाच माहीत नाही...मी फक्त धावत होतो...    खूप दूर आलो...आता कुणीच माझं नाही...कदाचित मीसुध्दा कुणाचा काय होतो...नसतोच कुणी..कुणाचा...सर्वजण आपापल्या डोक्यात कट्यार खुपसून येतो...कट्यार आत असेपर्यंत तो जिवंत असतो...वेदना वहात असते..रक्त ठिबकत असतं.. पण एकदा का जखम भरली की कट्यार आपोआप गळून पडते...कट्यारीच निखळणच देहासाठी विषारी बनतं... आणि हळूहळू देह कुजायला लागतो...आणि कट्यार मातीत पडून सुद्धा चमकायला लागते...  


                                    

Tuesday, November 10, 2020

चिरविश्रांती

 


 


 

            आज जेव्हा कधी भूतकाळाच्या गोधडीत मी शिरतो. तेव्हा निसटलेल्या क्षणाची काजळी डोळ्यात साचते. तू गेल्यापासून जवळपास चाळीस वर्षे ह्या अनोळखी रात्रीचा मी धनी झालो.पत्त्यांच्या डावाप्रमाणे आयुष्याची घडी विस्कळीत            झाली .आठवणीचे वारस तेवढे शिल्लक आहेत.तीन भेटींच्या  पलीकडे आहे तो फक्त पूर्णविराम.कधी कधी प्रश्न पडतो पहिल्या  भेटीपासूनच आपण तुटत गेलो का?

        बी.ए च शेवटचं वर्ष.आपली अंतिम परीक्षा जवळ आली तेव्हा मी थोडासा नाराज झालो. कॉलेजचं जीवन संपणार ह्याची घंटा वाजली होती. इतिहासाचा अखेरचा पेपर देऊन मी परतू लागलो.लाकडी पूल दिसताच मनाला हायस वाटलं.पूल ज्या ठिकाणी जमिनीला स्पर्श करतो त्यापासून थोड्या अंतरावर गंगाराम काकांची चहाची टपरी  आहे .तिथे चहा पिताना पुलाखालाची वासंती नदी बघून मन हंसासारखं मोहरून जात असे.आभाळ हळूहळू काळवंडू लागलं.वादळ येण्याची शक्यता वाटू लागली.मी लगबगीने पावले टाकू लागलो. समोरून कुणीतरी येत असल्याचा भास झाला.मी बघीतल, समोरून कस्तुरी येत होती.पांढराशुभ्र सलवार घालून नुकतीच एखादी परी अवतरल्याचा भास जाणवत होता. पण कुणास ठावूक ती दिसल्यावर मनात प्रचंड खळबळ माजत असे.तिची माझी नजरानजर झाली.मी काहीसा कचरलो,ती पुढे आली.                                      

" वसंत पेपर कसा गेला "                                                         तिने कपाळावर आलेली केसाची बट मागे सारत विचारलं.             मी तिच्याकडे बघू लागलो.गौरवर्ण चेहरा,कौलारू भुवया, आकाशगंगेसारखे डोळे आणि दुमडलेले ओठ.एकप्रकारची तेजस्वी शांतता तिच्या चेहऱ्यावर पसरलेली होती.

" छान. तुझा " मी बोलता झालो.

" बऱ्यापैकी " तिने माझ्या डोळ्यात बघितले.

" तुला चहा प्यायला आवडेल " ती म्हणाली.

" तुला आवडणार नाही "

  मी दोन चहा मागितले.

" मी गावाला जाणार आहे " तिने चहाचा घोट घेतला.

" कायमची..." चहाची प्रखर उष्णता तोंडाला भाजत गेली.

" तू थांबवू शकतोस " तिचे शब्द आचके देऊ लागले.

" काका किती पैसे झालेत " ती पैसे द्यायला गेली.

  माझे डोळे पाणावले होते.

" परत येशील ना " मी विचारलं.

" तू थांबशील "

  आणि ती ऑटोत बसली.


            भूतकाळात प्रवेश करण्याची ताकद असती तर मी ह्या ठिकाणी नक्कीच वापरली असती.वास्तविक पाहता माझ्या आयुष्याची सुरुवातच अखेरीस झाली. तिच्या जाण्याची जखम दिवसेंदिवस चिघळत गेली. पाच वर्षाच्या वियोगात प्रीतीच्या अग्निकुंडात मी भाजून निघालो.तीला जाऊ दिल्यापासूनच ती मला हवीहवीशी वाटू लागली.तिच्या शेवटच्या शब्दावर माझे अश्रू बाहेर आले,तेव्हा ती ऑटोत बसली.हा संकेत होता दुसऱ्या भेटीचा.

              दरवाजावर थाप पडली.मी बाहेर आलो.कस्तुरी उभी     होती.नववधुसारखी भासत होती.नाही ती नववधूच होती.तिने लग्नाची निमंत्रण पत्रिका समोर केली.

" एकटाच राहतोस ".. ती सोफ्यावर बसली

" तू गेल्यापासून ".....मी उत्तरलो

" पाणी घे "....मी ग्लास समोर केला 

  तिने डोळे पुसले.

" अखेर तू आलीसच "

" हो ".. तिचे अश्रू निरागस भासले

" पण मी तर केव्हाचा थांबून होतो..... "

 

  


               तुटण्याची शृंखला पहिल्या भेटीपासून सुरू झाली तरी मोडल्या मात्र दुसऱ्या भेटीत गेलो. त्यांनतर येणारी प्रत्येक रात्र मृत्यूचा पेला घेऊन येते व तो मी हसतमुखाने प्राशन करतो .जवळपास रोजच मरणाचे घडे साठवीत होतो.कुठलाच ताळेबंद मी बांधू शकत नव्हतो ना तीच्या भेटण्याचा ना जाण्याचा.ज्यावेळी तिने घराचा उंबरठा ओलांडला त्यावेळी माझ्या शरीराने प्राण सोडला.

          मुसळधार पावसाने हैरान  केल होत .मी कितीदा तरी दार लावलो तरी वादळी पावसाने ते उघडूच लागलं.एक जोराची वीज कडाडली आणि पटदिशी दरवाजा उघडला.मी तडक दार लावण्यास गेलो. समोर कस्तुरी.

"आत घेशील "                                                                   पावसाने तीच सर्वांग भिजल होत चेहऱ्यावरून पावसाचे थेंब ओघळून खाली पडू लागले.मी तिला आत घेतलं सोफ्यावर बसविल 

" तू बैस इथं मी टॉवेल घेऊन येतो "..                                              

" नको असू दे " 

" अग सर्दी होईल आजाराने ग्रस्त होशील "

" नाही फक्त तू इथं बैस "

तिने माझा हाथ पकडला. मी तिच्याकडे पाहिलं, नयनात असलेल्या व्याकुळतेची तीव्रता मला सहन झाली नाही.

मी खाली बसलो.

" जवळ येऊ बस ना "

तिने माझा हाथ अजून पण सोडला नव्हता.

" मला मिठी मारू शकतोस "

पौर्णिमेच्या चांदनी प्रमाणे तिची चर्या झळाळू लागली.

" मला अधिकार आहे "

" हो फक्त तुलाच आहे "

   

            मी तिला बाहुत घेतलं. महादेवाचा तांडव निद्रिस्त झाल्यासारखा वाटला.महासागराला चिरविश्रांती लाभली होती. तिच्या शरिराचा प्रत्येक अवयव माझ्या शरीरात प्रवेश करु लागला. ते आता अवयव नसून स्वतंत्र आत्मे झाले होते.मी तिच्या केसांवरून हाथ फिरविला. वादळ शमल होत.मृत्यूने केव्हाच तिला आपलस केलं होतं.


              निसर्गा ! कुठल्या पापाची फळे मी भोगत आहे ! कुठल्या ! तूच या खेळाचा सूत्रधार आहेस तर आम्हाला डाव का मांडू दिलास ! अर्ध्यातच खेळ संपवायचा होता तर एकाचाच बळी का ! ही सततची नरक यातना माझ्याच वाट्याला का ! नाही रे नाही सहन होत आहे ही कुचंबणा ! आता तरी मला निर्वाणाचा शाप दे रे ! होऊ दे एकदाची ह्या दुबळ्या देहाची राखरांगोळी ! मिळू दे परत एकदा चीरविश्रांती ! चिरविश्रांती !



Saturday, October 17, 2020

मी थकलो आहे इंद्रायणी



मला जाणवलेल कुठलं सत्य मी तुला सांगू

की नुसताच बघत राहू तुझ्या देहाकडे,

देहातून निघणाऱ्या प्रत्येक सम्भोगाकडे

हे असं प्रेत लटकविलेल्या झाडासारखं

 घट्ट राहन असह्य होतंय

रिकामी झालेली वाट माणसं तुडवल्या सारखी वाटतेय

फाटक बंद, दारे बंद, माणसे बंद, त्यांची मने बंद,

सार काही बंद

बेबंद होत गेलेला प्रत्येक टाहो सुद्धा बंद,

तुला माहित आहे फाशीवर लटकलेल्या

 माणसाचे पाय कसे फडफडतात,

तशीच फडफड काळजात भिनतेय,

मी थकलो आहे आता इंद्रायणी..खरचं थकलो आहे

लिहून लिहून कोड झालेली माझी बोटे झडू लागली आहेत,

माझी हरेक जाणीव बधीर होतेय

तुला पाहण,तुझ्यावर प्रेम करणं,तुला उसवण,तुला प्रसवण

सार काही थंड पडत आहे, सैल होत जाणाऱ्या  

मिठीसारखं....

इंद्रायणी.......,खरंच मी थकलो आहे

युगानुयुगे चाललेली जीवाची कुतरओढ 

आता थांबू पाहतेय.....तू सांग

मी संपवू का स्वतःला ,नष्ट करू का,

कि येऊ तुझ्याकडे,

तुझ्यातल्या प्रत्येक अंशाकडे.....परत,

देशील मला पुनर्जन्म 

वासनेच्या मंथनातून विझलेला अग्नी ठेवशील माझ्या जिभेवर,

मला विश्वास आहे..

तू हे करशील...

तू नक्कीच हे करशील,

मला संपविताना तू सुद्धा संपशीलच ना हळूहळू


Sunday, October 11, 2020

गंधार

    

           गंधार



गंधार संध्याकाळी मेला. सायंकाळचा संधीप्रकाश त्याच्या चेहऱ्यावरून सरकत संपूर्ण शरीरभर वाहू लागला.मध्यरात्री अबोल असलेल्या समुद्र सारखा तो निश्चल पडून होता.झोपेतच मेल्याने अजूनही जिवंत वाटत होता.स्वतःला वाचविण्याचा कसलाच आटापिटा त्याने केला नव्हता.त्याची खोलीसुद्धा समाधीत मग्न असलेल्या तपसव्या सारखी भासत होती.विलक्षण शांत.तरीपण एक भेसूर ताण वातावरणात जाणवत होता...

      आम्ही त्याला बेडवरून कपड्यानिशी उचललं.कपड्याला दारूचा वास येत होता.आम्ही चटईवर त्याचा देह ठेवला.आता ह्या देहाला नाव नव्हतं.फक्त तो रक्तामांसाचा गोळा होता.मी बराच वेळ खोलीत सैरभर पाहत होतो.तोपर्यंत त्याचे पाहुणे आले.मोजकेच.त्यांचा आकांताचा विधी सुरू झाला.मी चहा प्यायला गेलो.माणूस मेल्यानंतर घरात लावणार संगीत मला खूप डसंत.ते आतड पिळवटणार संगीत एकल तर खरच जीव द्यावासा वाटतो.माणसाचा मृत्यू हा एक सोहळाच पण हया सोहळ्यात असल भयाण संगीत नको. चहा संपला.मी गंधार सोबत घालविलेलं दिवस आठवायचा प्रयत्न करू लागलो पण ते आठवतच नव्हते.अखेरीस घराकडे वळलो.

            त्याचे एक दोन नातेवाईक प्रेत पायऱ्यांवरून खाली उतरवीत होते.मी पुढे झालो,सावकाशपणे त्याच प्रेत गाडीत ठेवलं आणि आत बसलो. प्रेताभोवती पांढरा कापड गुंडाळला होता.आज पहिल्यांदा  त्याच्या अंगावर कपडे खुलुन दिसत होते.तशी त्याला कपडे लागले नाहीत.म्यानातून काढलेल्या नंग्या तलवारीप्रमाणे तो जगला.पांढरा रंग शांतीच प्रतीक समजल्या जाते. किती भयंकर आहे ना माणूस मेल्यावर त्याला शांत झालेलं समजणं.

            स्मशान आलं .सरण आधीच रचलं होतं.सरणाच्या बाजूला दुसरं एक प्रेत जळत होत,ते एका लहान मुलांच प्रेत होत त्याच्या बाजूलाच एक बाई होती,ती त्या मुलाची आई असावी. छाती पिळवटून रडत होती.अतिशय आकांडतांडव.पण ती कुणासाठी रडत असावी?..सगळीकडे तर प्रेतेच जळत होती.थोड्या वेळानंतर गंधारचा देह सरणावर ठेवण्यात आला .रॉकेलचे शिंतोडे उडविण्यात आले आणि आगीने पेटलेली कडी  सरणाला लावली.जंगलाला लावलेल्या वणव्यासारख सरण जळू लागल.लालभडक आगीच्या लोळाने गंधारला गिळल.खूप वेळेपर्यंत सरण जळत होत.हळूहळू लोकसुद्धा निघू लागली .एवढ्यात एकजण माझ्यापाशी आला.आणि म्हणाला कवटी फुटली तुम्हीसुद्धा निघा.मला आश्चर्य वाटलं मला कसलाच आवाज आला नाही.अशावेळी काहीतरी फुटू शकते हे मला कस जाणवलं नाही. तसही आता थांबण्यात काही बाकी नव्हतं.

         राख उरेल पण कुणाचीही राख झालेली मला बघवल्या गेलं नसत.मी स्मशानातून बाहेर आलो.संध्याकाळच रात्रीत रूपांतर झाल होतं आणि रात्र अतिशय फुलून आली होती.बाळंत झालेल्या एका नववधू सारखी.

प्रश्न

       दिवसागणीक सरणारी रात्र आता मला छळते आहे. इतका मनस्ताप  कधीच मला झाला नव्हता. संध्याकाळ झाली की मी लिहायला बसायचो आणि सोबत प्यायलासुध्...